०७५ क्षीराचा क्षीराब्धि क्षरोनियां लोटे
क्षीराचा क्षीराब्धि क्षरोनियां लोटे ।
वैकुंठ सपाटे पाटु वाहे ॥ १ ॥
तें माथे हरिरूप कृष्णरूप माझें ।
नेणिजे तें दुजें इये सृष्टीं ॥ २ ॥
सांडुनी उपमा गोकुळीं प्रगट ।
चतुर्भुजपीठ यमुनेतटी ॥ ३ ॥
निवृत्ति निकरा वेणु वाहे धरा ।
यमुने स्थिरस्थिरा नामध्वनी ॥ ४ ॥
सरलार्थ:
क्षीरसमुद्रास भरती आली व तो वैकुंठाच्या रूपाने पार लागला तेच माझे हे हरिरूप कृष्ण वेषात मावले आहे. समुद्रच पाट झाला ।।१।। तसे निर्गुण निराकाररूपच सगुण साकार झाले ते या सृष्टित दुसरेपणा-द्वैत जाणत नाही ।।२।। आपले निरूपम स्वरूप बाजूला सारून ते ब्रह्म गोकुळांत प्रगट झाले. चार भुजांचे ते अधिष्ठान यमुनेच्या तिरावर आले आहे ।।३।। निवृत्तिचा सांठा असलेला हा श्रीहरि धरणीवर वेणु हातात वाजवीत आहे व यमुनेच्या तिरावर शांत असा आनंददायक आवाज घुमत आहे ।।४।।
भावार्थ:
क्षीरसागराला भरती ओहटी असली तरी वैकुंठात वाहणाऱ्या प्रेम पाटाचे पाणी समान वाहते. त्यात कमी जास्त होत नाही. त्या मायेने निर्मित केलेल्या कृष्णरुपाला पाहिले की मला सृष्टीतील दुसरे रुप पाहता येत नाही किंवा पहायचे नाही. अनुपम्य वैकुंठ लोकातील चतुर्भुज रुप सोडुन ते ब्रह्म गोकुळात कृष्णरुपात आहे. निवृतिनाथ म्हणतात त्या कृष्णरुपात वाजवलेल्या मधुर मुरली मुळे यमुनेचे अवखळ जळ ही स्थिर झाले.