०७६ निरशून्य गगनीं अंकुरलें एक

निरशून्य गगनीं अंकुरलें एक ।
ब्रह्मांड कवतुक लीळातनु ॥ १ ॥
तें माये वो हरि गोपिका भोगिती ।
शुखचक्राकृति कृष्ण मूर्ति ॥ २ ॥
निराभास आस निःसंदेह पाश ।
तोचि ह्रशीकेश नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ति प्रकार ध्यानाचा विचार ।
सर्वत्र श्रीधर यशोदेचा ॥ ४ ॥

सरलार्थ:

शून्याहि अतीत अशा महाकाशात अंकुरलेले एक कृष्णरूप-हा लीलेने धारण केलेला दिव्य देह सर्व ब्रह्मांडात कौतुकाचा विषय झाला आहे. ।।१।। (अंकुर हा आकार बीजातून व जमिनीत फुटतो व कृष्णदेह रूप अंकुर निराकारातून व महाअकाशांत फुटून आला हे कौतुक-आश्चर्य नव्हे काय ?) अगबाई त्या शंखचक्रा सह कृष्णाकार हरिचा भोग त्या गोपी घेत आहेत ।।२।। त्या आभास रहित स्वरूपाची आशा हे बंधन आहे यांत संशय नाही. तोच निराकार कृष्ण नंदाच्या घरी आहे ।।३।। एका प्रकारे निवृत्तिनाथांच्या ध्यानाचाच हा विचार आहे. हा यशोदेचा श्रीधर हा सर्वरूप आहे ।।४।।

भावार्थ:

त्या निराशुन्य आकाशातुन प्रगटलेल्या एका बीजाने आपल्या लिळेतुन हे जगत विस्तारले किंवा जन्माला घातले. तोच परमात्मा शंख चक्र घेऊन कृष्णरुपात गोकुळात अवतरला व त्याचे सुख तेथील गौवळणी नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, मी सर्वत्र त्या यशोदेच्या श्रीघराला पाहतो व तोच माझा ध्यानाचा प्रकार बनला आहे..

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *