०७८ निराळ निरसी जीवशीवरसीं

निराळ निरसी जीवशीवरसीं ।
सर्व ब्रह्म समरसीं वर्तें एक ॥ १ ॥
तें रूप परिकर कृष्णमूर्ति ठसा ।
गोपिकाकुंवासा नंदाघरीं ॥ २ ॥
संसाराचें तारूं ठाणमाण दिसे ।
शाम प्रभावसे तये ब्रह्मीं ॥ ३ ॥
निवृत्ति घनदाट कृष्ण घनःश्याम ।
योगी जनाध्यान नित्यरूपें ॥ ४ ॥

सरलार्थ:

एकांतस्थितीत, रसरहित, जीव व शिवाच्या या रूपात, या सर्वात समरस होऊन एक ब्रह्मच वावरते. ।।१।। ते व्यापक- विस्तारलेले रूपच कृष्णमूर्तिने साकार आहे व गोपिकांच्या जीवनाचा आश्रय नंदाच्या घरी आहे. ।।२।। ते कृष्णरूपडे संसारातून तारणारे व सर्व अवयवांनी रेखीव दिसत आहे. त्या ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णास तेज सावळ्या रूपांत संध्याकाळ व व सूर्योदयाची प्रभा व सूर्यास्ताची शामलता निळिमा या दोन वेळा दोन ठिकाणी दिसणाऱ्या पूर्व पश्चिम श्रीकृष्णरूपांत एकाच वेळी व एकाच ठिकाणी दिसत होत्या) निवृत्तिनाथ म्हणतात तो दाटलेला सावळेपणा म्हणजे कृष्ण योगीजनांचे नित्य ध्यान होऊन बसला आहे ।। ३ व ४ ।।

भावार्थ:

तो परमात्मा सर्व ठिकाणी जीवशिव स्वरुपात ओतप्रोत भरला आहे. व तोच एकत्वाने आपले ब्रह्मरुप सांगत असतो. तेच ब्रह्म सुंदर श्रीकृष्णरुप घेऊन गोपाळ व गोपकांचे आश्रयस्थान होण्यासाठी नंदाघरी आले आहे. सांजवातेतुन निघणाऱ्या प्रभे प्रमाणे ह्याचे श्यामवर्ण कृष्ण होऊन आले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात योगी ज्या रुपाचे ध्यान करतात ते घनश्याम रुप सर्व ठिकाणी भरलेले आहे. व ह्याचा मला अनुभव आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *