०८१ दुजेपणा मिठी आपणचि उठी

दुजेपणा मिठी आपणचि उठी ।
कल्पना हे सृष्टि गाळूं पाहे ॥ १ ॥
तें कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढें ।
दूध लाडेंकोडें मागतसे ॥ २ ॥
सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु ।
ब्रह्मींच उपवडू उघडा दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति उघड ब्रह्मांडामाजि लोळे ।
नंदाघरीं खेळे गोपवेष ॥ ४ ॥

सरलार्थ:

द्वैतपणास प्राप्त होण्याच्या निमित्ताने आपणच स्फुरण पावतो व कल्पनेची सृष्टि निर्माण करतो ।।१।। ते बळवान कृष्णरूप यशोदामाता आपल्यापुढे घेते व तो कृष्णहि कौतुकाने तिच्याजवळ दूध मागतो ।।२।। हा ब्रह्मांडाचा आकार म्हणजे विश्वरूपाने जागृती हे त्या ब्रह्मरूपाचे मूर्तिमंत जागे होणे आहे ।।३।। निवृत्ति म्हणतात – हे ब्रह्मस्वरूपी समरस असे गोपाच्या वेषांत नंदाच्या घरी खेळत आहे. ॥ ४॥

भावार्थ:

एकट्या असलेल्या परमात्माने आपल्या कल्पनेने जगतरुपाचा पसारा मांडला व ते द्वैताची निर्मिती करुन स्वतःला पाहू लागले. तोच परमात्मा कृष्ण रुप धारण करून यशोदे कडे लाडाकोडाने दुध दही मागत आहे. ज्या रुपात अनंत ब्रह्मांडे आहेत.ते कृष्णरुप नंदाघरी खेळीमेळेने राहते. निवृत्तिनाथ म्हणतात ते निर्गुण परब्रम्ह गोपवेशात नानाप्रकारचे खेळ करत नंदा घरी नांदत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *