०९० सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम
सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम ।
तो गोकुळीं आत्माराम दुध मागे ॥१॥
भाग्येंविण दुभतें दैव उभडतें ।
नंदाघरीं आवडते घरीं खेळे ॥२॥
मंजुळ वेणु वाजें लुब्धल्या धेनुवा ।
नंदाघरीं दुहावा पूर्ण वाहे ॥३॥
घरोघरीं दुभतें गौळियां परिपूर्ण ।
यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥४॥
गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख ।
गौळियां कौतुक करिती हरि ॥५॥
निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व ।
गोरक्ष गुह्म भाव सांगति मज ॥६॥
सरलार्थ:
सर्वव्यापक स्वरूप असलेला, सर्व देहात असलेला, आत्माराम ।।१।। स्वरूप सावळा श्रीकृष्ण गोकुळात यशोदेजवळ दूध मागत आहे ।।२।। भाग्यावांचून दैवास भरती येवून ते अनुकूल होत नाही. ते रूप नंदाघरी आवडेल ते खेळ खेळत होते ।।२।। त्याच्या त्या वेणूच्या अतिगोड आवाजाने गाई वेड्या झाल्या व नंदाच्या घरी दूध दुभत्याचा पूर आला ।।३।। गवळ्यांच्या घराघरात परिपूर्ण दुभते झाले व यशोदामाता दह्याचे नित्याने घुसळण करीत असे ।।४।। त्याचा गाई व गोपाळांना आनंद, नंदयशोदेस सुख होऊन, गौळणी कौतुक करीत होत्या ।।५।। गहिनीने त्या सर्वरूप देवाचा उपदेश निवृत्तिस केला व गोरक्षनाथांनी आपला नातू म्हणून गुप्त ठेवा मला सांगितला ।।६।।
भावार्थ:
सर्व नामरुपाने युक्त असणारा घनश्याम, गोकुळात दुध मागतो. त्या नंदाच्या भाग्यामुळे नवनिताचा दुभत्याचा सागर त्याला मिळाले ते भाग्य कृष्णरुपाने नानाविध खेळ खेऴते. त्या परमात्माच्या मुरलीचा धुनीवर सर्व गायी लुब्ध झाल्यामुळे नंदाघरी दुभत्याचा सुकाळ करत आहेत. व गौवळ्यांच्या घरी ह्या दुधाच्या सुकाळाने ते हरखुन गेले आहेत व यशोदे सह सर्व गौळणी दह्याची घुसळण करत असतात. नंद व यशोदा हे कृष्णरुपाने हरखुन गेले आहेत व ह्याचे आश्चर्य सर्व गोकुळाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या उपदेशाने मला त्याचे गुह्यरुप दिसले व ते गुह्य मला गोरक्षानाथानी ते सोपे करुन सांगितले.