०९२ न साहे दुजेपण आपण आत्मखुण
न साहे दुजेपण आपण आत्मखुण ।
श्रुतीही संपूर्ण हारपती ॥१॥
वेदरूप श्रीकृष्ण योगिया जीवन ।
तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥२॥
न दिसे वैकुंठीं योगियां ध्यानबीज ।
तो गोपाळांचें काज हरि करी ॥३॥
निवृत्ति गयनी हरि उच्चारित ।
माजि करि मनोरथ पुरी कामसिद्धि ॥४॥
सरलार्थ:
तो श्रीहरि दुसरेपण-द्वैत मुळीच सहन करीत नाही तर आत्मस्वरूपानेच आपण स्वतः आहे. तेथे उपनिषद श्रुतिहि नाहिशा होतात ।।१।। तो श्रीकृष्ण वेदरूपच असून योग्यांचे जीवन आहे. असे ते परिपूर्ण असून आत्म्यात रममाण होणारे आहे ।।२।। वैकुंठात ते दिसत नाही व योगीजनांचे ते बिजरूप ध्यान असलेला तो श्रीहरि गोपाळांचे काम स्वतः करतो ।।३।। श्रीगुरु गयनीने निवृत्तिस दिलेले हरि नाम उच्चारले असता तो सर्व इच्छा पूर्ण करतो ।।४।।
भावार्थ:
श्रुतींची ताकत ज्या स्वरुपाचे वर्णन करताना हरपते ते परमात्म स्वरुप द्वेताला नाकारत एकत्वाने अद्वैत स्वरुपातच राहते. तो परिपूर्ण असणारा परमात्मा वेदांचे स्वरुप व योगियांचे निजध्यान आहे. जो परमात्मा वैकुंठात दिसत नाही. जो योगियांच्या ध्यानात ही सापडत नाही. तो गोकुळात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सह हरिनाम उच्चारल्यामुळे मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कार्य सिध्दी होते.