०९३ नाहीं हा आकार नाहीं हा विकार
नाहीं हा आकार नाहीं हा विकार ।
चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥
हरिरूप पै जप हरिहररूप ।
गौळियांचें रूप सहज कृष्ण ॥२॥
हरिरूप घरीं सोळासहस्त्र नारी ।
तो बाळ ब्रह्माचारी गाई राखे ॥३॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें ।
तो यशोदे पुढें लोणी मागे ॥४॥
सरलार्थ:
आकार विकार रहित असलेला हा माझा श्रीहरि चार भुजांनी युक्त आहे ।।१।। हरिहर रूपाने नटलेल्या श्रीहरिच्या नामाचा जप भगवान शंकर करतात तो कृष्ण गौळ्याचे सहज तप आहे ।।२।। त्या श्रीहरिच्या घरी सोळा हजार स्त्रिया-पत्नी असून तो बाळ ब्रह्मचारीच आहे व वनांत गाई राखत आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात- प्रत्यक्ष दिसणाऱ्या त्या कृष्णरूपामध्ये परिपूर्ण ब्रह्म आहे; असे असूनहि तो यशोदामातेजवळ लोणी मागत आहे ही त्याची अपूर्व लीला आहे ।।४।।
भावार्थ:
तो चतुर्भुज परमात्मा जरी सगुण दिसत असला तरी त्याला रुप नाही व त्याच्यात दोषांचा लवलेश ही नाही. गोपाळांत असलेल्या कृष्णामध्ये हरि हराचे एकत्व आहे. जो कृष्ण गायी चारताना दिसतो त्याला सोळा सहख बायका आहेत तरी तो परमात्मा ब्रह्मचारी आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच सगुण सर्वव्यापक परब्रह्म यशोदेकडे लोणी मागत आहे.