०९५ योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न

योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न ।
तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥
हरिरूप माये सर्वाघटीं आहे ।
दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥
चिंति अजामेळा नाम आलें मुखा ।
तो वैकुंठीच्या सुखा देत हरी ॥३॥
निवृत्तिचें धन जगाचें जीवन ।
नाम नारायण तरुणोपाव ॥४॥

सरलार्थ:

योग्याचे धन व संपूर्ण ब्रह्म असा तो जनार्दन नंदाघरी आहे ।।१।। अग बाई ते श्रीहरिरूप सर्व प्राणिमात्रांच्या देहात आहे. पण गौळ्याचे दुध, लोणी चोरून खात आहे ।।२।। तो अजामेळा आपल्या मुलाचे चिंतन करीत असता नारायण असे नाम मुखात आले. त्याला या श्रीहरिने वैकुंठाचे सुख दिले ।।३।। ते नारायण नाम संसारातून तरून जाण्याचा मार्ग असून निवृत्तिचे धन व जगाचे जीवन आहे ।।४।।

भावार्थ:

त्या परब्रम्हाची प्राप्ती म्हणजे महाधन मानणारे योगी त्यांना हा सहज मिळत नाही पण हा जनार्दन नंदा घरी अवचित आला आहे. जे सर्वांघटी भरलेले आहे असे ते परब्रम्ह गौळ्यांचे दुध-लोणी खात आहे. त्या महापापी अजामेळा त्यांनी शेवटी घेतलेल्या नामामुळे वैकुंठाला पोहचला. तोच परमात्मा हा वैकुंठाचे सुख गोकुळात देतो आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ते नाम घेतले तर ते त्रैलोक्याला तारते ते नारायण नाम माझा ठेवा आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *