०९७ वेदबीज साचें संमत श्रुतीचें

वेदबीज साचें संमत श्रुतीचें ।
गुह्य या शास्त्रांचें हरि माझा ॥१॥
तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु ।
कृष्ण मुक्ति देतु जीवघातें ॥२॥
अर्जुना साहाकरी द्रौपदी कैवारी ।
तो विदुराचे घरीं अन्न मागे ॥३॥
निवृत्तीचें धन गोकुळीं श्रीकृष्ण ।
यादव सहिष्णु हरि माझा ॥४॥

सरलार्थ:

हा माझा श्रीहरि वेदाचे रहस्य, श्रुतिला मान्य व सर्व शास्त्राचे गुम स्वरूप आहे ।।१।। तो श्रीहरि प्रत्यक्ष मूर्तिमंत येथे खेळत असून दुष्टाना। जीवाने मारून मुक्तिचे दान करतो-मोक्ष देतो ।।२।। अर्जुनाचा युद्धामध्ये सहकारी, द्रौपदीचा कैवार घेणारा व विदुराच्या घरी अन्न मागत आहे ।।३।। गोकुळातील श्रीकृष्ण निवृत्तिचे धन असून यादवांचा उद्धटपणा सहन करणारा असा हा माझा हरि आहे ।।४।।

भावार्थ:

हा माझा हरि सर्व शस्त्रांचे मुळ असुन वेदांचे बीज आहे. त्या हरिला आपला जीव लावला की तो आपल्या जीवदशेतुन मुक्त करतो. तोच हरि श्रीकृष्ण बनुन गोकुळांत खेळतो आहे. तोच हरि अर्जुनाला साह्यभूत झाला, द्रौपदीचा तारणहार झाला तोच विदुरा घरी कण्या मागुन खातो. निवृतिनाथ म्हणतात, तोच हरि माझे महाधन आहे व तोच हरि गोकुळात गौळ्यांसारखा बनुन सर्वाटबरोबर सहिष्णु पध्दतीने राहात आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *