०९८ ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा ।
जो गौळियांच्या काजा तिष्ठतुसे ॥१॥
देखिलें सांवळे पूजिती गोवळे ।
नंदाघरी खेळे स्वामी माझा ॥२॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ ।
योगिये चिंतित हृदयीं जया ॥३॥
सरलार्थ:
ब्रह्मदेवादि देव ज्याच्या पूजेसाठी इच्छा करतात तो गौळियांचे काम-सेवा मिळेल म्हणून वाट पाहतो ।। १ ।। जे सावळे रूप पाहताच त्याची पूजा करतात. तो माझा स्वामी नंदाच्या घरात खेळत आहे ।। २ ।। निवृत्तिचे दैवत मनोरथ पूर्ण करते व योगीजन ज्याचे हृदयांत चिंतन करतात ॥३॥
भावार्थ:
ज्या श्रीकृष्णाची पुजा करायची ही इच्छा ब्रह्मादिकांना आहे. तोच श्रीकृष्ण गौवळ्यांची काम करण्यासाठी तिष्टत बसला आहे. गौवळी ज्या सावळ्या परब्रह्माला पुजतात तो नंदाघरी खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्याला योगी हृदयात ज्याला जपतात ते दैवत सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.