१०० निरालंब बीज प्रगटे सहज

निरालंब बीज प्रगटे सहज ।
तो गौळियांचें काज करी कृष्ण ॥१॥
हरि हा सांवळा वेधिलिया बाळा ।
माजि त्या गोपाला गायी चारी ॥२॥
वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण ।
तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥३॥
निवृत्तीचें ध्यान मनाचें उन्मन ।
योगिया जीवन हरि माझा ॥४॥

सरलार्थ:

जगाचा आश्रय पण स्वतः आश्रय रहित असा बीजरूप प्रभू या गोकुळांत सहज प्रगट होऊन गौळ्याची कामे करतो ।।१।। त्या सावळ्या श्रीहरिने त्या गोपीबाळांना वेधून घेतले व त्या गौळ्यांमध्ये तो गाई राखतो ।।२।। ब्रह्मदेवादि सर्व देव ज्याचे पायावर वंदन करतात. जो श्रीहरि यशोदेस स्तनपान मागतो ।।३।। मनाला नाहिसे करून उन्मन ध्यान निवृत्ति करीत आहे व तो माझा श्रीकृष्ण योग्यांचे जीवन आहे. योगी त्याच्या सुखासाठीच व त्या सुखानेच जगतात ।।४।।

भावार्थ:

जो परमात्मा कोणावर अवलंबुन नाही तो विश्वाचे बीज होऊन प्रगटला आहे. तरी ही तो गौळ्यांची कामे करत असतो. ज्याच्या रुपावर गवळणी लुब्ध झाल्या त्या कृष्णरुपात तो गायी चारतो. ज्याच्या चरणसेवेसाठी सुरगण व योगी तिष्टत असतात तो कृष्ण यशोदेकडे स्तनपानाचा हट्ट करतो. निवृती नाथ म्हणतात ज्या श्रीकृष्ण नामाचे ध्यानी ध्यान करतात तोच त्या योगीजनांचा प्राण आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *