१६० अनंतरूप देव अनंत आपण
अनंतरूप देव अनंत आपण ।
अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥ १ ॥
तो हा हरिमाये गोकुळीं अवतार ।
गोपीसंगें श्रीधर खेळतुसे ॥ २ ॥
शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे ।
तें गोपवेषें खेळे गोपाळांमाजी ॥ ३ ॥
निवृत्तिचें सार गयनीविचार ।
ब्रह्मचराचरमाजि वसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
हा अनंत रूपाने नटलेला देव आपणच अनंत झाला असून योग्यांना तीच आंत बाहेरची खूण आहे ।।१।। अग बाई तो हा श्रीहरि गोकुळांत अवतरला असून तो श्रीपती गोपीं बरोबर खेळत आहे ।।२।। शास्त्रास तो कळत नाही व वेदश्रुति तर अकारण त्याच्या स्वरूपाविषयी बडबड करतात तो श्रीहरि गौळ्याच्या रूपात गोपाळामध्ये खेळत आहे ।।३।। गुरू गयनीचा विचार हेच निवृत्तिचे सार-साध्य आहे. तेच ब्रह्म चराचर विश्वात व्यापून राहत आहे. ।।४।।
भावार्थ:
जो अनंत रुपाने सृष्टीत व्यापला आहे. त्यालाच सर्व रुपात पाहुन योग्यांना त्याच्या अंतर्बाह्य रुपात दिसतो तोच हरिचा अवतार गोकुळात झाला असुन तोच गोपीसंगे खेळत आहे. जो परमात्ना शास्त्राना कळत नाही ज्याच्या बद्दल बोलताना श्रुती ही बरळ होते. तोच परमात्मा गोपवेशात गोपाळांबरोबर खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात सर्व चराचरात व्यापुन असलेला परमात्मा आहे हे विचार सार गुरु गहिनीनाथांनी मला दिले.