१७१ कांसवीचीं पिलीं करुणा भाकी
कांसवीचीं पिलीं करुणा भाकी ।
परिसंपडलीं निकीं चरणसोय ॥ १ ॥
कामधेनु घरीं हरि माझा गोपाळ ।
मज काळवेळ नाठवें तैसी ॥ २ ॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन ।
तरीच शोकें प्राण तृषा हेतु ॥ ३ ॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु ।
नामाचा उच्चार तेणें छंदें ॥ ४ ॥
सरलार्थ:
कासवीची पिलही तिच्या दृष्टीची प्रार्थना करतात. परंतु आम्हाला मात्र कृपादृष्टीसह चरणांची चांगली प्राप्ति झाली आहे ।।१।। हा माझा श्रीहरि गोपाळ म्हणजे घरी आलेली कामधेनूच आहे. त्याच्या सेवेत आता मला काळवेळ – सुख दुःख आठवत नाही ।।२।। चातकाने चिंतन करूनहि मेघाचे पाणी मिळाले नाही तर प्राण्यांना लागलेली तहान ही शोकास कारण होते ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात- माझे श्रीगुरू हे स्वानंदाची कामधेनु आहे. त्यांच्या आवडीनेच माझ्या मुखातून हरिनामाचा उच्चार होतो ।।४।।
भावार्थ:
कासवीला स्तन नसतात त्यामुळे कासवीच्या पिलानी त्याच्या चरणकमलाची याचना केली व दृष्टीतून प्रेमपान्हा पाजायचे वरदान कासवीला मिळाले. त्यामुळे त्या हरिचरणांवर शरणागती केली तर तीच कामधेनु त्या भक्ताघरी येऊन राहते मग तो निवात काळवेळातीत होऊन हरिभजनात लीन होऊ शकतो. चातक पक्षी जमिनीवरचे पाणी पित नाही पावसाचे पाणी पितो व तो पडलाच नाही तर शोक ग्रस्त होऊन तृषार्थ होऊन त्याचे चिंतन करतो. निवृतिनाथ म्हणतात सतत स्वानंदात राहणारी माझी गुरुमाऊली माझी कामधेनु झाल्यामुळे मी सतत नामस्मरणाचा छंद जोपासत आहे.