३२० क्षमा परिपूर्ण हाचि नेम सम
क्षमा परिपूर्ण हाचि नेम सम । राम तूं निष्काम निःसंदेह ।। १ ।।
तूंचिरे साचार होसील पूर्णता । निर्गुणीं समता नाहीं जैसीं ।। २ ।।
व्योमामाजीं अभ्र जातसे सरळ । त्यासी अळुमाळ दृश्य नव्हे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे नव्हे हें तैसें चोख । अंतरबाह्य वेष आत्मरुपें ॥ ४ ॥
सरलार्थ:
परिपूर्ण क्षमा हाच नेम समत्वाने केलास तर तू निःसंशय निष्काम राम होशील ॥१॥ तूच खरा पूर्ण व सम होशील तसे निर्गुणाचे समत्व नाही ।।२।। आकाशात ढग हे सरळच जातात त्या आकाशास ते थोडेही दिसत नाही ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात- तसे हे निर्मळ स्वरूप असून अंतर्बाह्य रूपाने ते आत्मरूपाने नटले आहे ।।४।।